June 11, 2009

रब ने बना दी जोडी !!!

माझा गेल्या वर्षभरापासुन कुठलाही चित्रपट पाहिल्याचा उपवास अखेर मागच्या आठवड्यात "रब ने बना दी जोडी " ने सुटला. मी भारतात असतांना नवर्याने आधीच तो पिक्चर पाहिला होता. फोनवर "छान आहे, तुला आवडेल " असेही सांगुन झाले होते. त्यामुळे उत्सुकता होतीच नाहीतर हल्ली "छान आहे" असे कुठल्या पिक्चरबद्दल सहसा आम्ही बोलतच नाही.


पिक्चर पाहिल्या नंतर नेहमीप्रमाणे मसाला चहाचे घुटके घेता घेता पतिदेवांनी विचारले, "हं, कसा वाटला?"
"ठीक" मी
"----"
"लग्नानंतर कुणीही एवढे बदलेल अस मला नाही वाटत" मी
"खरच--- या साठी तुला आवडला नाही..... मग पुन्हा एकदा विचार कर" असे म्हणत त्याने लग्नातल्या आमच्या मोठ्या फोटोकडे नजर टाकली.

--------------------------------------------------------------------------------

आमच्या दोघांचे ठरवुन झालेले लग्न. घरातल्या मोठ्यांनी पुढाकार घेऊन मुलगा मुलगी बघण्याचे कार्यक्रम आणि नंतर चट मंगनी पट शादी झाली. साखरपुडा ते लग्न यात खुपसा वेळ नव्हताच त्यामुळे भेटी गाठी वगैरे झाल्याच नाहीत. एकमेकांना समजणे, चर्चा करणे असे काही काही झाळ नाही. लग्नाची तारिख जवळ आली तशी मला या गोष्टीची खुपच काळजी वाटायला लागली होती. माझ्या बहुतेक मैत्रिणी लग्ना आधी होणार्या नवर्याला भेटल्या होत्या, बोलल्या होत्या. मी मात्र एकदम अज्ञातात उडी घेत होते.

लग्न होऊन मी नव्या घरात आले. पहिल्या दहा दिवसात नवर्याचे अन माझे जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी टोकाचे विरुद्ध मत असल्याचे माझ्या लक्षात आले म्हणजे आम्हा दोघांच्याही लक्षात आले. शिवाय नव्या घरातली प्रत्येक गोष्ट माझ्या माहेरापेक्षा कमालीची वेगळी आहे , हे पाहुन मी भांबावुन गेले. मनात सारखे एकच घोळायचे , या माणसाशी आपले एकाही बाबतीत मत जुळत नाही, कसे होणार? रोज हाच विचार मनात करुन मी एका निष्कर्षाप्रत आले - आपला निर्णय चुकला, ठाम चुकला .... नवर्यालाही असेच वाटतय का, हे मात्र मला कळत नव्हते. त्याच्याशी याबाबतीत बोलायलाच हवे, असे वाटत होते पण घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला दोघांना खुपसा एकत्र वेळ मिळायचा नाही.

लग्नाला सव्वा महिना झाला. देवीच्या दर्शनासाठी म्हणुन फक्त आम्ही दोघेच जाणार हे कळल्यावर मी मनोमन ठरवले की आज बोलायचेच. काय बोलायचे याचीही मनातल्या मनात उजळणी करुन झाली. दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेर एका बेंचवर आम्ही यऊन बसलो.
"मला तुमच्याशी बोलायचय. "
"बोल ना"
"अं....."
"....."
सगळ मनात उजळवलेले तसेच राहिले आणि आपण नेमके कस बोलायच या ताणाने मी चक्क हमसुन रडायला लागली. पण मग अजुनही आपल्यासाठी बर्यापैकी अनोळखी असलेल्या माणसासमोर रडायची लाज वाटुन मी सुरुवात केली. मराठी माणूस नेहमी अशा अवस्थेत इंग्रजीचा आधार घेतो
"I don't think we are made for each other. I can not stay with someone who is ... who doesn't fit in my expectations"
पतिदेव स्तंभित. पण माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी त्यांनी डोळ्यांनीच मला "तू बोल"ची खूण केली.
"गेल्या काही दिवसात झालेल्या बोलण्या वरुन मला वाटते आपली एकही आवडनिवड जुळत नाही. आयुष्य सोबत काढायच असेल तर आपल्यात काहीतरी एकमत असाव लागेल ना?"
"अग पण लग्नाला फक्त चाळीस दिवस झालेयेत आपल्या."
"पण तरीही मला नाही वाटत आपले हे नाते खुप दिवस टिकेल."
"थोडा वेळ दे, आपले नाते अजुन immature आहे initial stage ला आहे. हळुहळू आपण बदलुया एकमेकांसाठी."
""किती बदलणार....?संपूर्ण बदलाव लागेल आपल्या दोघांना, मला नाही वाटत ते शक्य आहे."

नवरा फक्त हसला. म्हणाला " महिने दे , मग तू म्हणशील तसेच करुया"

-----------------------------------------------------------------------------------
लग्नाला आता नऊ वर्षे होत आलीत. या नऊ वर्षात काय काय बदललय आम्हा दोघात? सगळच... अगदी सगळ बदललय. तो मी झालाय अन मी त्याच्या रंगाने न्हाऊन निघालीय.
नऊ वर्षापूर्वी पिझ्झा "आय हेट " म्हणणारी मी आता नवर्याने पिझ्झा खायला जाऊया म्हणायचा अवकाश की झटपट तयार होते.
चायनीज "नको बाबा" म्हणणारी मी आता चायनीज रेस्टॉरेंट दिसले की "ओह येस्स" म्हणते.
कविता बिविता "नाही नाही , मुळीच नाही" म्हणणारा तो आता आवर्जुन छानशी कविता वाचायला मिळाली की मला फॉरवर्ड करत असतो.
गझल " ओह नो" म्हणणारा तो आमच्या पहिल्या बाळाची चाहुल लागल्याचे कळताच आनंदाने मला जगजीत सिंगच्या "लाईव प्रोग्राम्"ला घेऊन गेला.

रब ने बना दी जोडीच्या निमित्ताने कितीतरी दिवसांनी ते जुने दिवस आठवुन खुप हसलो. देव जोड्या बनवतांना उगीच रेघा ओढत नाही तर विचार करुन बनवतो, यावर माझा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला.

May 18, 2009

मेड येता घरा तोची दिवाळी दसरा !!!

मेड येता घरा तोची दिवाळी दसरा !!!

बंगलोरहुन सिंगापूरला आले खरी पण इथल्या आयुष्याशी जुळवुन घेतांना मला सतत एकाच व्यक्तीची आठवण यायची आणि ती म्हणजे मंजू माझी बंगलोरमधली कामवाली बाई ।

दिवसभर काम काम , सुरुवातीला वैताग यायचा पण मग हळुहळू सवय झाली। वेळेत सगळी काम संपायला लागलीत। तरीही दिवस संपल्यावर परदेशात राहत असल्याचा सॉलिड पश्चाताप व्हायचा। देशातल्या लोकांना मात्र वाटत की इथे मी सगल्या मशिनचे बटन फिरवते आणि मग झुल्यावर जाउन बसते ;) असो...

तर या कठिन आयुष्याशी जुळवुन घेताच होते की आमच्या घरी एक नन्ही परी उर्फ नन्ही शैतान आली । तिने माझे वेळापत्रक सगळ उलट सुलट करून टाकले । एकही काम पूर्ण होण्याच्या आत बाईसाहेबांची झोप पूर्ण आणि मग आईसाहेबांना पुन्हा एकदा छळायला तैयार !!!

मला सुपरवुमनाचा खिताब मिळाला असताच खरे तर पण मी नेमकी या कामानी आजारी पडले। पतिदेवानी लगेचच माझा विरोध पत्करून मेड शोधायाला सुरुवात केली। अनेक एजन्सीजला फोन करून आपल्या गरजा सांगायच्यात। मग एजन्सीज आपल्याला मेडची माहिती पाठवणार त्यातून आपण एक दोन निवडायच्यात। मग त्यांचाटेलीफोनिक इन्टर्व्ह्यु घ्यायचा। शिवाय मेड ठेवायची असेल तर एक परीक्षाही द्यावी लागते। ती पास झाल्यानंतर गव्हरमेन्टला कळवायचे. अशा चक्रातुन फायनली आम्ही एक कामवाली निवडली।

तर अशा प्रकारे डोमाचे आमच्या घरी आगमन झाले। उत्तर भारतीय असली तरी सुरुवातीला तिच्याशी आम्ही हिन्दी बोलल्यानंतर असा काही चेहरा करायची की क्षणभर मलाच कळायचे नाही की मी कुठल्या भाषेतून बोलतेय ।

काम शिकवणे म्हणजे तर माझीच एक परीक्षा होती। माझ्या मुलांनी माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेउन ठेवलीय म्हणुन बरे , नाहीतर डोमा मातेला मी साष्टांग नमस्कार केला असता ।

"चपाती --- वो क्या होता है, मुझे पता नही " हे ऐकून तर मी गारच पडले होते। पण आता पंधरा दिवसाच्या ट्रेनिंग नंतर डोमा सुरेख चपात्या बनवते। स्वच्छतेच्या बाबतीत मात्र अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, हे नक्की।
सध्या तरी ती मी काम सांगते तेवढाच करू शकते। बघुया पुढे काय होते।

May 05, 2009

मी परत आलेय

आय एम बॅकचे शब्दश: भाषांतर मी परत आलेय तर मंडळी आता या ब्लॉगला भेट देत राहा ।

एक गुड न्यूज आहे ... नाही नाही आता पुन्हा तसली न्यूज नाही बुवा देणार। तर गुड न्यूज अशी आहे की माझा सुपर वुमन बनण्याचा वेड़ा हट्ट मी सोडलाय आणि शेवटी एक पूर्णवेळ कामवाली बाई ठेवण्याचा शहाणा निर्णय घेतलाय .
एक लहान बाळ आणि एक पाच वर्षाचा लिटिल मॉंस्टर या दोघांना सांभाळुन आणि घरातली सगळी काम आवरणे सोपे नाही हे नवर्याने मी भारतातून येण्याआधीच ओळखले होते पण मला सुपर वुमन बनण्याचा अफाट उत्साह !!! कामवाली बाई वगैरे काही नको सगळे काही मीच सांभाळणार, असा फाजील आत्मविश्वास घेउन मी परत तर आले पण एकटीने सगळी तारेवरची कसरत करतांना सडकुन आजारी पडले ।

या आजारपणात आलेल्या शहाणपणाने आम्ही लगेच मेडचा शोध घ्यायला सुरुवात केली। पण तो शोध आणि बोध पुढच्या पोस्टमध्ये। सध्या इतकाच की आता मला बराच वेळ मिलतो आणि तो मी सत्कारणी लावायचे ठरवले आहे ।

हिप हिप हुर्रे !!! भेटत राहुया

February 19, 2009

सृजनानंद


सृजनानंद
पुन्हा एकदा वेणा....


खेळ जीवघेणा...


हाती येता सोनुला


विसरली यातना...
आईपण... पुन्हा एकदा आई झाले . यावेळी देवाने दिली एक गोड बाहुली :) आई होणे किती अवघड ... किती क्लेश्दायक.... पण हातातल्या सोनुल्या कडे पाहिले आणि सगळं सगळं विसरली...


एक मुलगा एक मुलगी.... कुटुंबाचा चौकोन परिपूर्ण झाला... अजुन काय हवे?October 25, 2008

मी नाही काम करणार ज्जा!!!

मला एक कळतच नाही आजकाल मुलींनी हा नवाच सुर काय लावलाय। अगदी सगळ्या भारतीय मुली हल्ली म्हणतात "मला ना अस्सा नवरा हवा की जो घरातही अगदी बरोबरीने काम करणार" त्यावरुन एक दोन घटस्फोट माझ्याच ओळखीत झाल्यावर मग मात्र मला धक्काच बसला.

मुलींना स्वयंपाक करता यावा ही लग्न करतांना जवळ जवळ सगळ्याच मुलांची अपेक्षा असते... यात म्हणे आजकाल मुलींना अपमान वाटतो। कुणी सांगेल का यात अपमानास्पद असे काय आहे?

जगाच्या पाठीवर जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी आपण भारतीय मुली स्वत:चे गोडवे गात असतो आम्ही अशा पतिव्रता... पतिची अशी सेवा करतो... यंव नी त्यंव.... कधी कधी वाटते, नवऱ्यांना जर तोंड उघडायची संधी दिली तर सगळ्या जगाला कळेल की भारतीय पुरुष किती बिच्चारा आहे। बायकोने स्वयंपाक करायचा आणि तो खाऊ घालतांना मात्र "मीच कशी एकटी काम करते" याचा पाढा वाचुन दाखवायचा.... च्च च्च च्च .... बिचारा नवरा कसा ते जेवण गिळतो त्याचे त्यालाच माहिती.

नांव बदलणार नाही, मंगळसुत्र घालणार नाही, टिकली बांगडीचा अट्टाहास नको हे काही अंशी समजुन घेता येते। राहणीमान बदलले त्यात या गोष्टी सांभाळणे कदाचित कठिण झाले असेल पण मध्यंतरी या सगळ्या अटी व्यतिरिक्त एक नवीनच गोष्ट ऐकली. लग्न झाल्यावर तिने त्याला सांगितले "मला मूल नको... मलाच का मूल व्हायला हवे, तुला का नको?" हा तिचा सवाल. "अग तुला होणारे मूल तुझे अन माझंच तर असेल ना... वगैरे वगैरे" त्याचा जवाब. नंतर थोडे दिवस समजुत घालणे आणि अजुन दोन चार वर्षे "तिलाच कधीतरी मूल होउ द्यावेसे वाटेल" म्हणुन वाट बघितली पण नाहीच. "मूल स्त्रीला होणे" हे तिला "स्त्रीनेच स्वयंपाक करण्याइतकेच" हीन वाटायेच... परिणीती घटस्फोटात.

नौकरी करुन रोजच्या रोज स्वयंपाकही केला आणि मुलांनाही सांभाळले... एवढेच काय आम्हाला संस्कार दिलेत आणि उच्च शिक्षणही... ती व्यक्ति म्हणजे माझी आई। आई स्वयंपाक करते म्हणुन हीन आणि पप्पा करत नाहीत म्हणुन उच्च असे कधीच वाटले नाही. उलट नौकरी करुनही संसाराचा खुपसा भार आईनेच उचलला आणि पपांना त्यांच्या करीअरमध्ये कधी घरच्या कटकटींचा सामना करावा लागला नाही, या गोष्टीचे कौतुक आणि कृतज्ञता नेहमी त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसली.

ज्या मुली आजकाल "नवऱ्याला स्वयंपाक यायलाच हवा"चा अट्टाहास धरतात त्यापैकी किती जणीनी वडिलांनी बनवलेले जेवण खाल्लेय? किती मुलींच्या आईने अगदी असाच अट्टाहास केलाय?
शेफ असलेला संजीव कपूर स्वत:च्या घरी मात्र अल्योनाने म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले जेवणच पसंद करतो। सौ माधुरी नेने म्हणे डॉ. श्रीरामचा डबा स्वत: बनवुन देते ई.ई. रसभरीत गोष्टी अगदी चवीने वाचायच्या आणि नंतर ये रे माझ्या मागल्या.

मुलींना पैसे कमावता येईल, संसाराला हातभार लावता येईल याचे शिक्षण जरूर द्यावे पण जोडीने संसार टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तडजोडीचे शिक्षण देणे खुप खुप आवश्यक आहे।

मुलगी किंवा स्त्री ही निसर्गाने बनवली आहे तशीच राहणार. काही जबाबदाऱ्या निसर्गाने स्त्री पुरुष दोघांवर टाकल्यात. त्यांचा अव्हेर करुन चालणार नाही. शिवाय त्या दोघांची शरीर रचना किती अन कशी वेगळी असते हे ही समजुन घेणे आवश्यक आहे. एकाच कंपनीत सारख्याच पदावर काम करणाऱ्या स्त्री अन पुरुष कामगारांची पाहणी केली असतांना आढळुन आले की स्त्री अधिक क्षमतेने स्ट्रेस हाताळु शकते याउलट पुरुषाला मात्र सारख्याच पातळीच्या स्ट्रेसने बीपी, हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

जेव्हा नवरा बायको दोघेही ऒफिस मधुन घरी येतात त्यावेळी पुरुष आल्या आल्या सोफ्यावर बसुन पाण्याची अपेक्षा करतो आणि स्त्री पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागते यात महत्वाचा हात असतो निसर्गाचा.... थकवा झटकुन आपल्या लोकांसाठी पटकन कामाला लागावे यात तिचे हार्मोन्स तिला मदत करत असतात।

पुरुषाने निर्बंध जीवन जगावे अन स्त्री ने मात्र केवळ कष्टच करावे अशा मताची मुळीच नाही। पण मुलींनी निसर्गदत्त जबाबदाऱ्या अव्हेरुन उगीच संसाराची माती करावी, हे मात्र पटत नाही. त्याला स्वयंपाक येत नसेल पण राजकारणातल, खेळातलं त्याला आपल्यापेक्षा जास्त समजते, याचे कौतुक हवच... त्याच्या इतर मित्रांपेक्षा त्याने किती लवकर प्रगती केली याचे मोल नाही का?

हे सगळं काही लिहुन झाल्यावर मुळ्ळीच स्वयंपाक न येणाऱ्या पण माझ्यावर जीव ओवाळुन टाकणाऱ्या माझ्या लाडक्या नवऱ्याला हा लेख भेट....

August 21, 2008

दंतकथा

दंतकथा
मुलाचा चौथा वाढदिवस झाला आणि त्या रात्री त्याचे दात ब्रश करतांना पाहिले की मागच्या एका दाताला तपकिरी / चॉकलेटी रंगाचा डाग पडलाय. आधी वाटले केकचा डाग असावा. पण दात घासल्यानंतरही तो डाग तसाच... मग मात्र धस्स झाले. चार वर्षाच्या मुलाचा दात किडलाय की काय या भितीने रात्रभर झोपच आली नाही। दुसऱ्याच दिवशी धावत पळत डेंटिस्ट गाठला. चेक केल्यानंतर कळले की दात पूर्ण किडलेला नाही. नुकतीच सुरुवात झालीय.तो डाग डॉक्टरांनी त्यांच्या हत्यारांनी पळवुन लावला. आणि दातात कॅविटी/ खड्डा नसल्याचे सांगितले तेव्हा जीव भांड्यात पडला. दोन तीनदा ब्रशिंग आणि चॉकलेट्स, केक , पेस्ट्रीज पूर्ण बंद किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ले तर चालेल असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरकडे त्या उंच खुर्चीवर बसलेला तो छोटासा जीव बघुन मला एकदम माझेच लहानपण आठवले. डेंटिस्ट कडे मी दहा वर्षाची असतांना गेली असेन माझा एक दात मागच्या बाजुला उगवतोय असे माझ्या आई वडिलांना वाटल्यामुळे ते मला घेऊन गेले होते. त्या खुर्चीवर बसण्याची भिती आजुबाजुला पसरलेल्या उपकरणामुळेच आली असावी. मी तिथे बसण्या आधीच मोठ्याने भोकांड पसरले होते. शेवटी पपांनाच मला मांडीवर घेउन बसावे लागले.
पण माझ्या बाळाने चक्क न घाबरता डॉक्टरला चेक करु दिलेच शिवाय डॉक्टरांनी त्याला समजावुन सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच दिवसा पासुन अमलात आणली. चॉकलेट्स बंद. ब्रशिंग दिवसातुन दोनदा अगदी नियमित.
त्याच्या दातांनी माझेच डोळे उघडले. आता आम्ही सगळेच गोड कमी खातोय शिवाय त्याच्या बरोबरच ब्रशही नियमितपणे दोनदा करतो.
माझ्या मैत्रिणींच्या घरीही थोड्याफार फरकाने हीच कहाणी. प्रत्येकीने एकदातरी डेंटिस्टची पायरी मुलांच्या तिसऱ्या चौथ्या वर्षीच चढलेली. माझ्या काही मैत्रिणींच्या मुलांचे दातही पाचव्या वर्षा आधीच काढावे लागलेत.
हे असे होण्याचे प्रमाण अचानकच का वाढले असावे याचा मी थोडा अभ्यास आणि डॉक्टरांशी चर्चा करुन आढावा घेतला
चॉकलेट्स नक्कीच दोषी आहेत पण खरे दोषी आहेत पालक।

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपणच त्यांना लावतो तर गोडाचे प्रमाण सुरुवातीपासुनच कमी ठेवावे।
कुठल्याही चांगल्या कामाचे बक्षिस म्हणुन चॉकलेट्स किंवा केक्स देउ नये।
दुध पिउन झाल्यावर मुलांना आठवणीने चुळ भरायला लावणे अत्यावश्यक आहे।
रात्री झोपतांना दुध देत असाल तर त्यानंतर ब्रश करायला सांगणे विसरु नका।
कोल्ड ड्रिंक्स फक्त छोट्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा हानीकारक आहेत।
घरात / बाहेर कोल्ड ड्रिंक्स च्या सेवनावर नियंत्रण करा।
मुले सोबत असतांना त्यांच्या समोर आपण जे पेय पितो तेच त्यांनाही प्यावेसे वाटणे साहजिक आहे। स्मोकर्स.... तुमचे स्वत:चे दंत आरोग्य खालावणार हे नक्कीच. पण तुमच्या सवयी पुढे तुमच्या मुलाने/ मुलीने उचलल्या तर साहजिकच येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे शरीराचे नुकसान होणार.
आई होण्याच्या आधी पासुनच स्त्रियांनी दातांची काळजी घ्यावी।
गरोदरपणात दातांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। बाळाचे दाताचे आरोग्य तो पोटात असतांनाच बहुतांशी ठरते.

तुम्हा सर्वांचे दात शाबुत राहोत आणि येणाऱ्या पिढीला चांगले भक्कम दात देण्याची शक्ति आपल्या पिढीला मिळो हीच प्रार्थना :)

June 17, 2008

फादर्स डे...

God took the strength of a mountain,

The majesty of a tree,

The warmth of a summer sun,

The calm of a quiet sea,

The generous soul of nature,

The comforting arm of night,

The wisdom of the ages,

The power of the eagle's flight,

The joy of a morning in spring,

The faith of a mustard seed,

The patience of eternity,

The depth of a family need,

Then God combined these qualities,

When there was nothing more to add,

He knew His masterpiece was complete,

And so, He called it ... Dad (author unknown)
१३ जुन १९९२ फादर्स डेच्या अलिकडे पलिकडे एक दोन दिवस. पण तो दिवस अगदी काळा ठरला आमच्यासाठी. पितृछत्र उजाडण्याच्या मार्गावर होते त्या वेळी माझं. पण आपल्या सगळ्यांचा तो आकाशातला पिता... त्याला या लेकीची दया आली. दहा हातांनी नियती आमच्या सुखाचा गळा आवळायला आली होती खरी पण मग तिची पकड सैल पडली.
माझ्यावर लहानपणापासुन एकाच व्यक्तिचा मोठ्ठा प्रभाव होता. ती व्यक्ति म्हणजे माझे पप्पु. पपांना नेहमीच पप्पु म्हणायची मी आणि मग ममा चिडायची. मी मोठी झाल्यावर तर तिला या गोष्टीचा फार राग यायचा पण पपा मात्र त्यावरुन कधीच चिडले नाहेत. दादी किंवा राजकुमारी याच नावाने बोलवायचेत मला. दादी- कारण माझीच दादागिरी चालायची घरावर. राजकुमारी... हे केवळ एक संबोधन नव्हते त्यांच्यासाठी. अक्षरश: राजकुमारी सारखेच वाढवले त्यांनी मला. छोट्या गावात राहुनही अगदी वाट्टेल त्या खेळण्यांचा हट्ट पुरवला गेला. अगदी दहा वर्षांची होईपर्यंत माझ्या वाढदिवसासाठी मला नेहमीच पपा पुण्याहुन कपडे आणत. फक्त कपडेच नसायचेत... खुप सारी खेळणी, खुप खुप पुस्तकं. वाचनाची आवड त्यांनीच दिलीय मला. पुढेपुढे पपांना जेव्हा जाणवले की कपड्या खेळण्यांपेक्षा मी पुस्तकांच्या भेटीने खुष होते तेव्हा त्यांनी दर दोन महिन्या आड पुणे फेरी सुरु केली. प्रत्येकवेळी एक नवा पुस्तकांचा खजिना त्यांच्या बॅगमधुन बाहेर पडायचा आणि मी समृद्ध होऊन जायचे. मिशा नावाचा एक छोट्यांसाठीचे मासिक त्यांनी खास रशियाहुन आमच्यासाठी वर्षभर मागवले. सोनेरी दिवस होते ते माझ्यासाठी.
रात्रंदिवस आमच्याकडे शेतकरी, ट्रक ड्रायव्हर लोकांचे येणेजाणे असायचे. कुणी गरीबीने खंतावुन, कोणी दारुत तर्र होऊन यायचे पण आमच्या घरातून बाहेर पडतांना मात्र सगळे अगदी आनंदी होऊन जायचे. पपांचा स्वभावच तसा होता - अगदी लाघवी.
माझं दहावीचं वर्ष सुरु झाले आणि जणु काही पपाच दहावीला असल्यासारखे रात्र रात्र माझ्याबरोबर जागायला लागलेत. माझ्या दहावी झालं की मला कुठेतरी बाहेर शिकायला पाठवायची त्यांची इच्छा होती. "माझी दादी पुण्यात शिकेल आणि माझ्यापेक्षाही मोठे यश मिळवेल." (माझे पपा पुणे युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत) "मोठ्ठी डॊक्टर बनणार आहे माझी दादी." त्यांच्या या स्वप्नांचे कधी ओझं नाही झालं मला कारण पपा जे सांगताय बोलताय ते होणारच असा विश्वास होता. वाटायच मी नक्कीच हे सगळं काही करुन दाखवेल पण असे काही होण देवाजीच्या मनात नव्हते कदाचित.
१३ जुनला पपांचा ऍक्सिडेंट झाला. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने ते कोमात गेले. अपघात झाल्यावर ६ तास ते उन्हात पडुन होते. नंतर धुळ्याच्या सरकारी इस्पितळात आणि तिथुन नागजी हॊस्पिटल नासिकला. पण पपांच्या अपघाताची खबरच आम्हाला एक दिवस उशिरा मिळाली. पपांची अवस्था पाहिल्यावर देव निर्दय आहे हाच एक विचार वारंवार मनात यायचा. प्रार्थना करतांनाही मी देवाला म्हणायचे "देवा, पपांनी खुप दिलय रे मला पण त्यांना अजुन मी काहीच दिल नाहीये. त्यांचे एक स्वप्न त्यांच्या लेकीकडुन पूर्ण होतांना त्यांना पाहु दे, बस्स" . देवाने ऐकले आणि पप्पु परत मिळालेत. माझ्यासाठी वर्षातला एकच नाही प्रत्येक दिवस फादर्स डे आहे. I Love you, Papa"