October 25, 2008

मी नाही काम करणार ज्जा!!!

मला एक कळतच नाही आजकाल मुलींनी हा नवाच सुर काय लावलाय। अगदी सगळ्या भारतीय मुली हल्ली म्हणतात "मला ना अस्सा नवरा हवा की जो घरातही अगदी बरोबरीने काम करणार" त्यावरुन एक दोन घटस्फोट माझ्याच ओळखीत झाल्यावर मग मात्र मला धक्काच बसला.

मुलींना स्वयंपाक करता यावा ही लग्न करतांना जवळ जवळ सगळ्याच मुलांची अपेक्षा असते... यात म्हणे आजकाल मुलींना अपमान वाटतो। कुणी सांगेल का यात अपमानास्पद असे काय आहे?

जगाच्या पाठीवर जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी आपण भारतीय मुली स्वत:चे गोडवे गात असतो आम्ही अशा पतिव्रता... पतिची अशी सेवा करतो... यंव नी त्यंव.... कधी कधी वाटते, नवऱ्यांना जर तोंड उघडायची संधी दिली तर सगळ्या जगाला कळेल की भारतीय पुरुष किती बिच्चारा आहे। बायकोने स्वयंपाक करायचा आणि तो खाऊ घालतांना मात्र "मीच कशी एकटी काम करते" याचा पाढा वाचुन दाखवायचा.... च्च च्च च्च .... बिचारा नवरा कसा ते जेवण गिळतो त्याचे त्यालाच माहिती.

नांव बदलणार नाही, मंगळसुत्र घालणार नाही, टिकली बांगडीचा अट्टाहास नको हे काही अंशी समजुन घेता येते। राहणीमान बदलले त्यात या गोष्टी सांभाळणे कदाचित कठिण झाले असेल पण मध्यंतरी या सगळ्या अटी व्यतिरिक्त एक नवीनच गोष्ट ऐकली. लग्न झाल्यावर तिने त्याला सांगितले "मला मूल नको... मलाच का मूल व्हायला हवे, तुला का नको?" हा तिचा सवाल. "अग तुला होणारे मूल तुझे अन माझंच तर असेल ना... वगैरे वगैरे" त्याचा जवाब. नंतर थोडे दिवस समजुत घालणे आणि अजुन दोन चार वर्षे "तिलाच कधीतरी मूल होउ द्यावेसे वाटेल" म्हणुन वाट बघितली पण नाहीच. "मूल स्त्रीला होणे" हे तिला "स्त्रीनेच स्वयंपाक करण्याइतकेच" हीन वाटायेच... परिणीती घटस्फोटात.

नौकरी करुन रोजच्या रोज स्वयंपाकही केला आणि मुलांनाही सांभाळले... एवढेच काय आम्हाला संस्कार दिलेत आणि उच्च शिक्षणही... ती व्यक्ति म्हणजे माझी आई। आई स्वयंपाक करते म्हणुन हीन आणि पप्पा करत नाहीत म्हणुन उच्च असे कधीच वाटले नाही. उलट नौकरी करुनही संसाराचा खुपसा भार आईनेच उचलला आणि पपांना त्यांच्या करीअरमध्ये कधी घरच्या कटकटींचा सामना करावा लागला नाही, या गोष्टीचे कौतुक आणि कृतज्ञता नेहमी त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसली.

ज्या मुली आजकाल "नवऱ्याला स्वयंपाक यायलाच हवा"चा अट्टाहास धरतात त्यापैकी किती जणीनी वडिलांनी बनवलेले जेवण खाल्लेय? किती मुलींच्या आईने अगदी असाच अट्टाहास केलाय?
शेफ असलेला संजीव कपूर स्वत:च्या घरी मात्र अल्योनाने म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले जेवणच पसंद करतो। सौ माधुरी नेने म्हणे डॉ. श्रीरामचा डबा स्वत: बनवुन देते ई.ई. रसभरीत गोष्टी अगदी चवीने वाचायच्या आणि नंतर ये रे माझ्या मागल्या.

मुलींना पैसे कमावता येईल, संसाराला हातभार लावता येईल याचे शिक्षण जरूर द्यावे पण जोडीने संसार टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तडजोडीचे शिक्षण देणे खुप खुप आवश्यक आहे।

मुलगी किंवा स्त्री ही निसर्गाने बनवली आहे तशीच राहणार. काही जबाबदाऱ्या निसर्गाने स्त्री पुरुष दोघांवर टाकल्यात. त्यांचा अव्हेर करुन चालणार नाही. शिवाय त्या दोघांची शरीर रचना किती अन कशी वेगळी असते हे ही समजुन घेणे आवश्यक आहे. एकाच कंपनीत सारख्याच पदावर काम करणाऱ्या स्त्री अन पुरुष कामगारांची पाहणी केली असतांना आढळुन आले की स्त्री अधिक क्षमतेने स्ट्रेस हाताळु शकते याउलट पुरुषाला मात्र सारख्याच पातळीच्या स्ट्रेसने बीपी, हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

जेव्हा नवरा बायको दोघेही ऒफिस मधुन घरी येतात त्यावेळी पुरुष आल्या आल्या सोफ्यावर बसुन पाण्याची अपेक्षा करतो आणि स्त्री पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागते यात महत्वाचा हात असतो निसर्गाचा.... थकवा झटकुन आपल्या लोकांसाठी पटकन कामाला लागावे यात तिचे हार्मोन्स तिला मदत करत असतात।

पुरुषाने निर्बंध जीवन जगावे अन स्त्री ने मात्र केवळ कष्टच करावे अशा मताची मुळीच नाही। पण मुलींनी निसर्गदत्त जबाबदाऱ्या अव्हेरुन उगीच संसाराची माती करावी, हे मात्र पटत नाही. त्याला स्वयंपाक येत नसेल पण राजकारणातल, खेळातलं त्याला आपल्यापेक्षा जास्त समजते, याचे कौतुक हवच... त्याच्या इतर मित्रांपेक्षा त्याने किती लवकर प्रगती केली याचे मोल नाही का?

हे सगळं काही लिहुन झाल्यावर मुळ्ळीच स्वयंपाक न येणाऱ्या पण माझ्यावर जीव ओवाळुन टाकणाऱ्या माझ्या लाडक्या नवऱ्याला हा लेख भेट....

August 21, 2008

दंतकथा

दंतकथा
मुलाचा चौथा वाढदिवस झाला आणि त्या रात्री त्याचे दात ब्रश करतांना पाहिले की मागच्या एका दाताला तपकिरी / चॉकलेटी रंगाचा डाग पडलाय. आधी वाटले केकचा डाग असावा. पण दात घासल्यानंतरही तो डाग तसाच... मग मात्र धस्स झाले. चार वर्षाच्या मुलाचा दात किडलाय की काय या भितीने रात्रभर झोपच आली नाही। दुसऱ्याच दिवशी धावत पळत डेंटिस्ट गाठला. चेक केल्यानंतर कळले की दात पूर्ण किडलेला नाही. नुकतीच सुरुवात झालीय.तो डाग डॉक्टरांनी त्यांच्या हत्यारांनी पळवुन लावला. आणि दातात कॅविटी/ खड्डा नसल्याचे सांगितले तेव्हा जीव भांड्यात पडला. दोन तीनदा ब्रशिंग आणि चॉकलेट्स, केक , पेस्ट्रीज पूर्ण बंद किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ले तर चालेल असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरकडे त्या उंच खुर्चीवर बसलेला तो छोटासा जीव बघुन मला एकदम माझेच लहानपण आठवले. डेंटिस्ट कडे मी दहा वर्षाची असतांना गेली असेन माझा एक दात मागच्या बाजुला उगवतोय असे माझ्या आई वडिलांना वाटल्यामुळे ते मला घेऊन गेले होते. त्या खुर्चीवर बसण्याची भिती आजुबाजुला पसरलेल्या उपकरणामुळेच आली असावी. मी तिथे बसण्या आधीच मोठ्याने भोकांड पसरले होते. शेवटी पपांनाच मला मांडीवर घेउन बसावे लागले.
पण माझ्या बाळाने चक्क न घाबरता डॉक्टरला चेक करु दिलेच शिवाय डॉक्टरांनी त्याला समजावुन सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच दिवसा पासुन अमलात आणली. चॉकलेट्स बंद. ब्रशिंग दिवसातुन दोनदा अगदी नियमित.
त्याच्या दातांनी माझेच डोळे उघडले. आता आम्ही सगळेच गोड कमी खातोय शिवाय त्याच्या बरोबरच ब्रशही नियमितपणे दोनदा करतो.
माझ्या मैत्रिणींच्या घरीही थोड्याफार फरकाने हीच कहाणी. प्रत्येकीने एकदातरी डेंटिस्टची पायरी मुलांच्या तिसऱ्या चौथ्या वर्षीच चढलेली. माझ्या काही मैत्रिणींच्या मुलांचे दातही पाचव्या वर्षा आधीच काढावे लागलेत.
हे असे होण्याचे प्रमाण अचानकच का वाढले असावे याचा मी थोडा अभ्यास आणि डॉक्टरांशी चर्चा करुन आढावा घेतला
चॉकलेट्स नक्कीच दोषी आहेत पण खरे दोषी आहेत पालक।

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपणच त्यांना लावतो तर गोडाचे प्रमाण सुरुवातीपासुनच कमी ठेवावे।
कुठल्याही चांगल्या कामाचे बक्षिस म्हणुन चॉकलेट्स किंवा केक्स देउ नये।
दुध पिउन झाल्यावर मुलांना आठवणीने चुळ भरायला लावणे अत्यावश्यक आहे।
रात्री झोपतांना दुध देत असाल तर त्यानंतर ब्रश करायला सांगणे विसरु नका।
कोल्ड ड्रिंक्स फक्त छोट्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा हानीकारक आहेत।
घरात / बाहेर कोल्ड ड्रिंक्स च्या सेवनावर नियंत्रण करा।
मुले सोबत असतांना त्यांच्या समोर आपण जे पेय पितो तेच त्यांनाही प्यावेसे वाटणे साहजिक आहे। स्मोकर्स.... तुमचे स्वत:चे दंत आरोग्य खालावणार हे नक्कीच. पण तुमच्या सवयी पुढे तुमच्या मुलाने/ मुलीने उचलल्या तर साहजिकच येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे शरीराचे नुकसान होणार.
आई होण्याच्या आधी पासुनच स्त्रियांनी दातांची काळजी घ्यावी।
गरोदरपणात दातांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। बाळाचे दाताचे आरोग्य तो पोटात असतांनाच बहुतांशी ठरते.

तुम्हा सर्वांचे दात शाबुत राहोत आणि येणाऱ्या पिढीला चांगले भक्कम दात देण्याची शक्ति आपल्या पिढीला मिळो हीच प्रार्थना :)

June 17, 2008

फादर्स डे...

God took the strength of a mountain,

The majesty of a tree,

The warmth of a summer sun,

The calm of a quiet sea,

The generous soul of nature,

The comforting arm of night,

The wisdom of the ages,

The power of the eagle's flight,

The joy of a morning in spring,

The faith of a mustard seed,

The patience of eternity,

The depth of a family need,

Then God combined these qualities,

When there was nothing more to add,

He knew His masterpiece was complete,

And so, He called it ... Dad (author unknown)
१३ जुन १९९२ फादर्स डेच्या अलिकडे पलिकडे एक दोन दिवस. पण तो दिवस अगदी काळा ठरला आमच्यासाठी. पितृछत्र उजाडण्याच्या मार्गावर होते त्या वेळी माझं. पण आपल्या सगळ्यांचा तो आकाशातला पिता... त्याला या लेकीची दया आली. दहा हातांनी नियती आमच्या सुखाचा गळा आवळायला आली होती खरी पण मग तिची पकड सैल पडली.
माझ्यावर लहानपणापासुन एकाच व्यक्तिचा मोठ्ठा प्रभाव होता. ती व्यक्ति म्हणजे माझे पप्पु. पपांना नेहमीच पप्पु म्हणायची मी आणि मग ममा चिडायची. मी मोठी झाल्यावर तर तिला या गोष्टीचा फार राग यायचा पण पपा मात्र त्यावरुन कधीच चिडले नाहेत. दादी किंवा राजकुमारी याच नावाने बोलवायचेत मला. दादी- कारण माझीच दादागिरी चालायची घरावर. राजकुमारी... हे केवळ एक संबोधन नव्हते त्यांच्यासाठी. अक्षरश: राजकुमारी सारखेच वाढवले त्यांनी मला. छोट्या गावात राहुनही अगदी वाट्टेल त्या खेळण्यांचा हट्ट पुरवला गेला. अगदी दहा वर्षांची होईपर्यंत माझ्या वाढदिवसासाठी मला नेहमीच पपा पुण्याहुन कपडे आणत. फक्त कपडेच नसायचेत... खुप सारी खेळणी, खुप खुप पुस्तकं. वाचनाची आवड त्यांनीच दिलीय मला. पुढेपुढे पपांना जेव्हा जाणवले की कपड्या खेळण्यांपेक्षा मी पुस्तकांच्या भेटीने खुष होते तेव्हा त्यांनी दर दोन महिन्या आड पुणे फेरी सुरु केली. प्रत्येकवेळी एक नवा पुस्तकांचा खजिना त्यांच्या बॅगमधुन बाहेर पडायचा आणि मी समृद्ध होऊन जायचे. मिशा नावाचा एक छोट्यांसाठीचे मासिक त्यांनी खास रशियाहुन आमच्यासाठी वर्षभर मागवले. सोनेरी दिवस होते ते माझ्यासाठी.
रात्रंदिवस आमच्याकडे शेतकरी, ट्रक ड्रायव्हर लोकांचे येणेजाणे असायचे. कुणी गरीबीने खंतावुन, कोणी दारुत तर्र होऊन यायचे पण आमच्या घरातून बाहेर पडतांना मात्र सगळे अगदी आनंदी होऊन जायचे. पपांचा स्वभावच तसा होता - अगदी लाघवी.
माझं दहावीचं वर्ष सुरु झाले आणि जणु काही पपाच दहावीला असल्यासारखे रात्र रात्र माझ्याबरोबर जागायला लागलेत. माझ्या दहावी झालं की मला कुठेतरी बाहेर शिकायला पाठवायची त्यांची इच्छा होती. "माझी दादी पुण्यात शिकेल आणि माझ्यापेक्षाही मोठे यश मिळवेल." (माझे पपा पुणे युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत) "मोठ्ठी डॊक्टर बनणार आहे माझी दादी." त्यांच्या या स्वप्नांचे कधी ओझं नाही झालं मला कारण पपा जे सांगताय बोलताय ते होणारच असा विश्वास होता. वाटायच मी नक्कीच हे सगळं काही करुन दाखवेल पण असे काही होण देवाजीच्या मनात नव्हते कदाचित.
१३ जुनला पपांचा ऍक्सिडेंट झाला. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने ते कोमात गेले. अपघात झाल्यावर ६ तास ते उन्हात पडुन होते. नंतर धुळ्याच्या सरकारी इस्पितळात आणि तिथुन नागजी हॊस्पिटल नासिकला. पण पपांच्या अपघाताची खबरच आम्हाला एक दिवस उशिरा मिळाली. पपांची अवस्था पाहिल्यावर देव निर्दय आहे हाच एक विचार वारंवार मनात यायचा. प्रार्थना करतांनाही मी देवाला म्हणायचे "देवा, पपांनी खुप दिलय रे मला पण त्यांना अजुन मी काहीच दिल नाहीये. त्यांचे एक स्वप्न त्यांच्या लेकीकडुन पूर्ण होतांना त्यांना पाहु दे, बस्स" . देवाने ऐकले आणि पप्पु परत मिळालेत. माझ्यासाठी वर्षातला एकच नाही प्रत्येक दिवस फादर्स डे आहे. I Love you, Papa"

June 10, 2008

मोकळीक जुन्या आणि नव्या पिढीतली

श्रुती आणि मी हनिमूनच्या काळातल्या मैत्रिणी. केसरी बरोबर हनिमूनला आलेल्या चाळीस कपल्स पैकी श्रुती आणि देव एक. देवच्या मानाने रुपात थोडी डावी असली तरी तिच्या चेहऱ्यात एक निराळाच गोडवा होता.
केसरीच्या एका खेळात आम्हाला कळले की आमचे लग्न एकाच दिवशी एकाच मुहुर्तावर झालय. त्या खेळानंतर बऱ्याचदा गप्पात आम्हाला जाणवायचे की आमच्या आवडी निवडी पण सारख्याच आहेत. मग काय, हळुहळू आमची छान गट्टी जमली. एकत्र फिरणे, जेवणे गप्पा करणे. दिवस कसे संपलेत ते कळलच नाही. अकरा दिवसांचा हनिमून संपवुन मुंबईला परत आल्यानंतर अधुन मधुन आमचे फोनवर बोलणेही होत असे. जळगावसारख्या अतिशय थंड (सुस्त म्हणायचेय मला) गावातून आलेली असल्यामुळे मुंबईची जीवन शैली मला खुपच त्रासदायक वाटायची. बऱ्याचदा श्रुतीला मी ते बोलूनही दाखवायची आणि मग ती मला समजावायची "अग होईल सवय हळुहळू. नौकरी कर मग तुला खुप मज्जा वाटेल."
श्रुती एका डायमंड कंपनीत रिसेप्शनिस्ट होती. तिचा नवरा देव एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर. त्यादिवशी मला मरीन लाईन्सला एका इंटरव्ह्यु साठी जायचे होते. श्रुतीला फोन करून मी भेटीबद्दल विचारले. तीही मला भेटायला खुप उत्सुक होती. मला म्हणाली तू ये मग मी बॉसला विचारुन दोन तास ऑफ घेते. खुप गप्पा करुया.
गप्पा करताना नवीन लग्न झालेल्या दोन मुली एकमेकीना जे प्रश्न विचारणार तिकडे आमच्या गप्पांची गाडी वळली आणि श्रुतीचा चेहरा एकदम बदलला. डोळे भरुन आलेत. अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात चेहराही एकदम केविलवाणा दिसत होता. मला तर तिला विचारावे की नको असा प्रश्न पडला एकतर आमची मैत्री अगदीच नवी नवी. शिवाय इतका खाजगी विषय... उगाच खोलात शिरायला नको म्हणुन मग मीही गप्प बसुन तिच्याकडे एक गुपचुप एक नजर टाकली. थोडावेळ सांगु की नको अशा संभ्रमात मग तिने स्वत:च बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी तिने जे सांगितले ते आठवले की आजही अंगावर काटा येतो.
देव एकुलता एक मुलगा. ठाण्यात आईवडिलांचा एक बेडरुमचा फ्लॅट. देवचे लग्न होईपर्यंत बेडरूम मध्ये त्याचे आई वडिल झोपत आणि देव हॉलमध्ये. लग्न झाल्यावर (एका बेडरूमच्या घरात) अलिखित नियमाने बेडरूम खरे तर देवलाच मिळायला हवी आणि त्यानेही ते ग्रुहीत धरले होते. पण लग्न झाल्या दिवसापासून एकदाही ते बेडरूम मध्ये झोपु शकले नव्हते. हनिमून वरुन परत आल्यावर रात्री देवने बेडरूम मध्ये जाण्यासाठी पाऊल टाकले तर त्याच्या आईने त्याला सांगितले की "तुम्ही दोघे हॉलमध्येच झोपा. आता या वयात आम्हाला जागा बदल झाली तर झोप येणार नाही." श्रुतीला तर यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते.
पण तरीही श्रुती आणि देव दरवाजा नसलेल्या हॉलमध्ये जाऊन झोपले. देव झोपला दिवाण वर आणि श्रुती जमिनीवर गादी टाकुन. त्या रात्री दोघानाही झोप आलीच नाही. श्रुती रात्रभर रडत होती आणि देव छताकडे पाहुन नक्की काय घडले याचा विचार करत होता. असे दोन तीन दिवस गेल्यावर मग मात्र श्रुतीला देवचा राग आला. जे काही झाले त्यानंतर आई वडिलाना समजावणे त्याचेच काम होते. श्रुतीने ठरवुन टाकले की आता देवला स्पर्श करु द्यायचा नाही. हॉलला दरवाजा नसल्यामुळे देवलाही श्रुतीशी जवळीक करता येत नव्हती. लग्नाला २ महिनेही झालेले नसताना अशा भयानक मानसिक स्थितीला त्या दोघाना सामोरे जावे लागत होते.
हा असा प्रकार ऐकल्यावर मी एकदम हतबुद्धच झाले. सल्ला तरी काय देणार. पण मग तरीही माझ्या परीने मी तिला थोडे समजावुन घरी परतली. नवऱ्याला सांगु नको असे वचन श्रुतीने माझ्याकडुन घेतल्यामुळे देवशी या विषयावर बोलण्याचा मार्गच खुंटला.
असेच सहा महिने गेलेत. आम्ही आपापल्या आयुष्यात मग्न झालोत. फोन वर बोलणे तर व्हायचे पण पुन्हा तो विषय आमच्या बोलण्या कधीही आला नाही. एक दिवस मात्र श्रुतीचा मला "भेटायला लगेच ये" असा फोन आला. तिच्याकडे असलेली "गुड न्युज" तिला माझ्याशी शेअर करायची होती. माझा आश्चर्यचकित चेहरा पाहुन तीच म्हणाली "अग आम्ही दोघानी नवीन मार्ग शोधला. आता आम्ही अर्धी रात्र किचन मध्ये झोपतो."
लोकल मधुन घरी परत येताना मला सारखे वाटत होते "एकुलता एक मुलगा... त्याच्या सांसारिक सुखात अडथळा करणारे त्याचेच आई वडिल आणि तरीही हसत मुखाने सहन करणारी बिचारी सून. तक्रार करायचीच नाही का तिने... किंवा मग तिच्या नवऱ्याने. शारिरीक सुख हा इतका खाजगी विषय असतो का की आपण आपल्या आई वडिलाना पण सांगु नये. कुठेतरी किचनमधल्या टीचभर जागेत घाईघाईने उरकलेल्या शारिरीक जवळिकीला शरीर सुख तरी कसे म्हणावे? आणि वरकडी म्हणजे मनाविरुद्ध सहन करुन तरीही आम्हाला हे पटत नाही, हे ही दाखवु नये. आई वडिलाना आपल्या लेकरांच्या सुखासाठी थोडीही तडजोड करणे, एवढे का खुपावे?" खुप प्रश्न पण सगळे अनुत्तरीत. विचार करुन मला वाटायचे डोके फुटुन जाईल. पण मग हळुहळू मी ही ते सगळे विसरली.
श्रुतीच्या बाळाला हॉस्पिटल मध्ये बघायला गेली तर जवळपास कुणी नाही असे बघुन ती हळुच म्हणाले "जरा नाकाजवळ घेउन बघ बरे, माझ्या बाळाला फोडणीचा तर वास येत नाहीयेना." आणि आम्ही दोघी दिलखुलास हसलो.

June 09, 2008

आकाश

हे तारकांनी भरलेले माझे आकाश... किती सुंदर दिसतय ना दुरुन पण सगळेच तारे या आकाशाला सजवणारे नाहीत, दुर्दैव माझं. काही तारे दुरुन तारे वाटतात खरे पण असतात मात्र दगड; चमचमणारे दगड. पण हो, अगदी सुंदर तारेही आहेत या आकाशात. माझे ममीपपा माझा गोडुला सतु, माझा निव्वळ परमानंद- माझा राधु. पण या सगळ्यापेक्षाही सुंदर आहे : माझ्या या आकाशाला सजवणारा, खऱ्या अर्थाने शोभा आणणारा एकच तारा... माझा एकमेव प्रिय सखा, माझा जीवनसाथी - माझा मनु. मनुशिवाय या तारांगणाला शोभा नाही. मनुशिवाय या आयुष्याची कल्पना पण करणे शक्य नाही. एक खरा मित्र, एक जबाबदार नवरा आणि एक प्रेमळ पिता या सगळ्या भुमिका इतक्या सुंदर पद्धतीने हाताळतांना त्याच्याशिवाय कोणालाच मी पाहिले नाही.पति पत्नीच्या नात्यात मैत्री हवी , असे म्हणतात ना. मी ही ऐकले होते लग्नाआधी. पण आमच्या दोघांत मात्र आधी पति पत्नीचे नाते आले आणि मग मैत्री. या सात वर्षात मात्र तो माझा सगळ्यात जवळचा मित्र झालाय. सगळं काही समजुन घेणारा, जमत असेल तरच त्यावर तोडगा काढणारा नाहीतर काही समस्या सरळ देवावर सोपवुन मोकळा होणारा असा हा माझा गोड मित्र। हे पान खास त्याच्यासाठी.
माझ्या आकाशीच्या या ध्रुव ताऱ्याला माझ्या आयुष्यातही अढळपद मिळो, हीच देवाला प्रार्थना.

May 15, 2008

आहे मनोहर तरी

इन्जिनीयरिन्गच्या शेवटच्या वर्षाला असतांना "आहे मनोहर तरी" वाचले होते. ते पुस्तक बिलकुल आवडल नव्हते. तसेही आत्मचरित्र वाचण काही खुप आनन्ददायक नसतच. पण आज जेव्हा आठवत तेव्हा सुनीता देशपान्डेन्चे कौतुक वाटते. पुल सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तिचे दोष लिहिणे आणि स्वत:चीच टिमकी वाजवणे सोपे नाही.ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा वाटले अगदी नियमितपणे लिहिन पण लिहायला सुरुवात केली तेव्हा जाणवाले हे येड्यागबाळ्याचे काम नाही. माझ्यासारख्या व्यक्तिचे तर मुळीच नाही. खुप लिहावसे वाटत असूनही मी लिहू शकत नाही. खुपदा वाटते "अरेच्च्या हे काय लोकांनी वाचण्यायासारखे नाही" तर कधी वाटते "हे वाचुन लोक काय म्हणतील". असे चारचौघात स्वत:बद्दलाच लिहिण्याइतके धैर्य नाहीच माझ्यात. मी केलेले चांगले काम असो किंवा कुठे झालेले माझे कौतुक असो मला पटकन ते सांगता येत नाही. माझे दु:ख फक्त माझ्याजवळच असते. हा दोषच म्हणाना स्वभावातला. पण असेच आहे करणार तरी काय.वेबदुनियेत एक फेरफटका मरुन पाहिला तर नियमित ब्लॉग लिहिणाऱ्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही. कुणी पिक्चर बद्दल लिहिलय, कुणी वीकेंडला केलेल्या स्वयंपाकाबद्दल. अगदी छोट्या छोट्या सुख, दु:खाबद्दल पण न लाजता कुणी लिहुन काढलय. असे सहज, सुंदर लिहिणे कधी जमणार मला. दिवसभर मी ब्लॉगवर काय लिहु , लिहिले तर कुणी हसणार तर नाही ना हाच विचार मी करत होते. काल रात्री असाच विचार करतांना मला वाटले ब्लॉग मी स्वान्त्सुखाय तर नक्कीच लिहु शकते ना....कोणी वाचुन वाईट म्हणाले तरी व्हर्चुअल दु:ख होईल. इंटरनेटमुळे एक बरय, सुख, दु:ख , मैत्री सगळे काही व्हर्च्युअली. कुठलही दडपण नाही. स्विच ऑफ केले की सगळी नाती बंद मग आपण आपल्या कोषात जायला मोकळे.सगळी नाती अशीच व्हर्च्युअल झाली तर कित्ती बरे ना.... उगाच नको असलेल्या नात्यांची ओझी वाहायला नकोत. नात्याबरोबर येणारे सुख, दु:ख, अपेक्षा, वेदना काही काही नको. तर आता इथे मी लिहित राहिन... जमले तर तुम्ही वाचत राहा.

February 26, 2008

एक कविता आवडलेली

ही कविता मला इंटरनेट वर सापडली... खुप आवडली म्हणुन इथे लिहून ठेवतेय।

i run my fastet
but i still get beat.
i land on my head
when i should be on my feet.

i try to move forward,
but i'm stuck in rewind.

why do i keep at it??
i wont be left behind.
the harder i'm thrown,
the higher i bounce.
i give it my all,
and that's all that counts.

in first place,myself,
i seldom find.
so i push to the limit-
i wont be left behind.

some poeple tell me
you can'tsome say don't.
some simply give up.
i reply,i won't.

the power is here,
locked away in my mind.
my perseverance is my excellence,
i won't be left behind.

make the best of each moment,
the future is soon the past.
the more i tell myself this,
the less i come in last.

throughout my competitions,
i've learned what winning is about.
a pain and clear lesson-
giving up is the easy way out.

so every night before i go to bed,
i hope in a small way i've shined.
tomorrow is a brand-new day,
and i wont be left behind.

ही कविता कोणाची आहे ? माहिती असल्यास सांगा।

स्फुर्ती...

दोनदा ब्लॉग सुरु करूनही काहीच न लिहिणारी मी यावेळी मात्र नियमित लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे। मला स्फूर्ती देणारी व्यक्ति आहे माझे प्रिय मैत्रिण सोनल देखणे। तिचा ब्लॉग तिच्या नावासारखाच देखणा आहे :)। तिचा ब्लॉग वाचला आणि पुन्हा एकदा लिहावास वाटल। Thanks Sonal for inspiring me.
हे पान सोनलसाठी आणि आमच्या पुन्हा गवसलेल्या मैत्रीसाठी ।

सोनल बद्दल काय लिहू... तिचा आणि माझा सहवास अवघा दोन अडीच महीन्याचा होता। तिचे दिसणे, राहणे , वागणे सगळच कसे देखणं होतं। आजही जेव्हा मला जोग क्लासेसचे ते दिवस आठवतात तेव्हा सोनल डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही । हो आणि प्राची आणि सोनालीच नाव घेतल्याशिवाय या आठवणी पूर्ण होणार नाहीत। प्राची आणि सोनल ओर्कुटवर मिळाल्यात आणि कितीतरी आठवणीना उजाळा मिळाला.
Thanks to Orkut for giving me back my long lost friends :)