श्रुती आणि मी हनिमूनच्या काळातल्या मैत्रिणी. केसरी बरोबर हनिमूनला आलेल्या चाळीस कपल्स पैकी श्रुती आणि देव एक. देवच्या मानाने रुपात थोडी डावी असली तरी तिच्या चेहऱ्यात एक निराळाच गोडवा होता.
केसरीच्या एका खेळात आम्हाला कळले की आमचे लग्न एकाच दिवशी एकाच मुहुर्तावर झालय. त्या खेळानंतर बऱ्याचदा गप्पात आम्हाला जाणवायचे की आमच्या आवडी निवडी पण सारख्याच आहेत. मग काय, हळुहळू आमची छान गट्टी जमली. एकत्र फिरणे, जेवणे गप्पा करणे. दिवस कसे संपलेत ते कळलच नाही. अकरा दिवसांचा हनिमून संपवुन मुंबईला परत आल्यानंतर अधुन मधुन आमचे फोनवर बोलणेही होत असे. जळगावसारख्या अतिशय थंड (सुस्त म्हणायचेय मला) गावातून आलेली असल्यामुळे मुंबईची जीवन शैली मला खुपच त्रासदायक वाटायची. बऱ्याचदा श्रुतीला मी ते बोलूनही दाखवायची आणि मग ती मला समजावायची "अग होईल सवय हळुहळू. नौकरी कर मग तुला खुप मज्जा वाटेल."
श्रुती एका डायमंड कंपनीत रिसेप्शनिस्ट होती. तिचा नवरा देव एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर. त्यादिवशी मला मरीन लाईन्सला एका इंटरव्ह्यु साठी जायचे होते. श्रुतीला फोन करून मी भेटीबद्दल विचारले. तीही मला भेटायला खुप उत्सुक होती. मला म्हणाली तू ये मग मी बॉसला विचारुन दोन तास ऑफ घेते. खुप गप्पा करुया.
गप्पा करताना नवीन लग्न झालेल्या दोन मुली एकमेकीना जे प्रश्न विचारणार तिकडे आमच्या गप्पांची गाडी वळली आणि श्रुतीचा चेहरा एकदम बदलला. डोळे भरुन आलेत. अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात चेहराही एकदम केविलवाणा दिसत होता. मला तर तिला विचारावे की नको असा प्रश्न पडला एकतर आमची मैत्री अगदीच नवी नवी. शिवाय इतका खाजगी विषय... उगाच खोलात शिरायला नको म्हणुन मग मीही गप्प बसुन तिच्याकडे एक गुपचुप एक नजर टाकली. थोडावेळ सांगु की नको अशा संभ्रमात मग तिने स्वत:च बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी तिने जे सांगितले ते आठवले की आजही अंगावर काटा येतो.
देव एकुलता एक मुलगा. ठाण्यात आईवडिलांचा एक बेडरुमचा फ्लॅट. देवचे लग्न होईपर्यंत बेडरूम मध्ये त्याचे आई वडिल झोपत आणि देव हॉलमध्ये. लग्न झाल्यावर (एका बेडरूमच्या घरात) अलिखित नियमाने बेडरूम खरे तर देवलाच मिळायला हवी आणि त्यानेही ते ग्रुहीत धरले होते. पण लग्न झाल्या दिवसापासून एकदाही ते बेडरूम मध्ये झोपु शकले नव्हते. हनिमून वरुन परत आल्यावर रात्री देवने बेडरूम मध्ये जाण्यासाठी पाऊल टाकले तर त्याच्या आईने त्याला सांगितले की "तुम्ही दोघे हॉलमध्येच झोपा. आता या वयात आम्हाला जागा बदल झाली तर झोप येणार नाही." श्रुतीला तर यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते.
पण तरीही श्रुती आणि देव दरवाजा नसलेल्या हॉलमध्ये जाऊन झोपले. देव झोपला दिवाण वर आणि श्रुती जमिनीवर गादी टाकुन. त्या रात्री दोघानाही झोप आलीच नाही. श्रुती रात्रभर रडत होती आणि देव छताकडे पाहुन नक्की काय घडले याचा विचार करत होता. असे दोन तीन दिवस गेल्यावर मग मात्र श्रुतीला देवचा राग आला. जे काही झाले त्यानंतर आई वडिलाना समजावणे त्याचेच काम होते. श्रुतीने ठरवुन टाकले की आता देवला स्पर्श करु द्यायचा नाही. हॉलला दरवाजा नसल्यामुळे देवलाही श्रुतीशी जवळीक करता येत नव्हती. लग्नाला २ महिनेही झालेले नसताना अशा भयानक मानसिक स्थितीला त्या दोघाना सामोरे जावे लागत होते.
हा असा प्रकार ऐकल्यावर मी एकदम हतबुद्धच झाले. सल्ला तरी काय देणार. पण मग तरीही माझ्या परीने मी तिला थोडे समजावुन घरी परतली. नवऱ्याला सांगु नको असे वचन श्रुतीने माझ्याकडुन घेतल्यामुळे देवशी या विषयावर बोलण्याचा मार्गच खुंटला.
असेच सहा महिने गेलेत. आम्ही आपापल्या आयुष्यात मग्न झालोत. फोन वर बोलणे तर व्हायचे पण पुन्हा तो विषय आमच्या बोलण्या कधीही आला नाही. एक दिवस मात्र श्रुतीचा मला "भेटायला लगेच ये" असा फोन आला. तिच्याकडे असलेली "गुड न्युज" तिला माझ्याशी शेअर करायची होती. माझा आश्चर्यचकित चेहरा पाहुन तीच म्हणाली "अग आम्ही दोघानी नवीन मार्ग शोधला. आता आम्ही अर्धी रात्र किचन मध्ये झोपतो."
लोकल मधुन घरी परत येताना मला सारखे वाटत होते "एकुलता एक मुलगा... त्याच्या सांसारिक सुखात अडथळा करणारे त्याचेच आई वडिल आणि तरीही हसत मुखाने सहन करणारी बिचारी सून. तक्रार करायचीच नाही का तिने... किंवा मग तिच्या नवऱ्याने. शारिरीक सुख हा इतका खाजगी विषय असतो का की आपण आपल्या आई वडिलाना पण सांगु नये. कुठेतरी किचनमधल्या टीचभर जागेत घाईघाईने उरकलेल्या शारिरीक जवळिकीला शरीर सुख तरी कसे म्हणावे? आणि वरकडी म्हणजे मनाविरुद्ध सहन करुन तरीही आम्हाला हे पटत नाही, हे ही दाखवु नये. आई वडिलाना आपल्या लेकरांच्या सुखासाठी थोडीही तडजोड करणे, एवढे का खुपावे?" खुप प्रश्न पण सगळे अनुत्तरीत. विचार करुन मला वाटायचे डोके फुटुन जाईल. पण मग हळुहळू मी ही ते सगळे विसरली.
श्रुतीच्या बाळाला हॉस्पिटल मध्ये बघायला गेली तर जवळपास कुणी नाही असे बघुन ती हळुच म्हणाले "जरा नाकाजवळ घेउन बघ बरे, माझ्या बाळाला फोडणीचा तर वास येत नाहीयेना." आणि आम्ही दोघी दिलखुलास हसलो.
6 comments:
प्रिंसेस,
तुम्ही मांडलेला हा विषय ब-यापैकी खाजगी म्हणता येईल असा आहे. मात्र तो खास शैलीत मांडलाही आहे.
"जरा नाकाजवळ घेउन बघ बरे, माझ्या बाळाला फोडणीचा तर वास येत नाहीयेना.".... मनाला चुटुक लावणारं वाक्य... !
खरंतर आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना समजुन घ्यायलाच हवं .. निदान अशा नाजुक प्रसंगी तरी..!
... भुंगा.
dhanyavaad Bhunga :)
Hi Princess..nice to read all your blogs..very perfect writting with prfect words in use :-) keep it up..
avghad gosht khup changalya paddhatine sangitali ahe..
lihinyachi paddhat ekda mast.
फारच सुंदर पोस्ट आहे . भुंगा ने माझ्या ब्लॉगवर लिंक टाकली म्हणुन वाचता आलं . शेवटपर्यंत वाचतांना सिरियस नोट शेवटच्या वाक्याला एकदम कॉमिक नोट होऊन जाते.. मस्त!!
धन्यवाद रुयम आणि काय वाटेल ते ( महेंद्र) :)
Post a Comment