June 11, 2009

रब ने बना दी जोडी !!!

माझा गेल्या वर्षभरापासुन कुठलाही चित्रपट पाहिल्याचा उपवास अखेर मागच्या आठवड्यात "रब ने बना दी जोडी " ने सुटला. मी भारतात असतांना नवर्याने आधीच तो पिक्चर पाहिला होता. फोनवर "छान आहे, तुला आवडेल " असेही सांगुन झाले होते. त्यामुळे उत्सुकता होतीच नाहीतर हल्ली "छान आहे" असे कुठल्या पिक्चरबद्दल सहसा आम्ही बोलतच नाही.


पिक्चर पाहिल्या नंतर नेहमीप्रमाणे मसाला चहाचे घुटके घेता घेता पतिदेवांनी विचारले, "हं, कसा वाटला?"
"ठीक" मी
"----"
"लग्नानंतर कुणीही एवढे बदलेल अस मला नाही वाटत" मी
"खरच--- या साठी तुला आवडला नाही..... मग पुन्हा एकदा विचार कर" असे म्हणत त्याने लग्नातल्या आमच्या मोठ्या फोटोकडे नजर टाकली.

--------------------------------------------------------------------------------

आमच्या दोघांचे ठरवुन झालेले लग्न. घरातल्या मोठ्यांनी पुढाकार घेऊन मुलगा मुलगी बघण्याचे कार्यक्रम आणि नंतर चट मंगनी पट शादी झाली. साखरपुडा ते लग्न यात खुपसा वेळ नव्हताच त्यामुळे भेटी गाठी वगैरे झाल्याच नाहीत. एकमेकांना समजणे, चर्चा करणे असे काही काही झाळ नाही. लग्नाची तारिख जवळ आली तशी मला या गोष्टीची खुपच काळजी वाटायला लागली होती. माझ्या बहुतेक मैत्रिणी लग्ना आधी होणार्या नवर्याला भेटल्या होत्या, बोलल्या होत्या. मी मात्र एकदम अज्ञातात उडी घेत होते.

लग्न होऊन मी नव्या घरात आले. पहिल्या दहा दिवसात नवर्याचे अन माझे जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी टोकाचे विरुद्ध मत असल्याचे माझ्या लक्षात आले म्हणजे आम्हा दोघांच्याही लक्षात आले. शिवाय नव्या घरातली प्रत्येक गोष्ट माझ्या माहेरापेक्षा कमालीची वेगळी आहे , हे पाहुन मी भांबावुन गेले. मनात सारखे एकच घोळायचे , या माणसाशी आपले एकाही बाबतीत मत जुळत नाही, कसे होणार? रोज हाच विचार मनात करुन मी एका निष्कर्षाप्रत आले - आपला निर्णय चुकला, ठाम चुकला .... नवर्यालाही असेच वाटतय का, हे मात्र मला कळत नव्हते. त्याच्याशी याबाबतीत बोलायलाच हवे, असे वाटत होते पण घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला दोघांना खुपसा एकत्र वेळ मिळायचा नाही.

लग्नाला सव्वा महिना झाला. देवीच्या दर्शनासाठी म्हणुन फक्त आम्ही दोघेच जाणार हे कळल्यावर मी मनोमन ठरवले की आज बोलायचेच. काय बोलायचे याचीही मनातल्या मनात उजळणी करुन झाली. दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेर एका बेंचवर आम्ही यऊन बसलो.
"मला तुमच्याशी बोलायचय. "
"बोल ना"
"अं....."
"....."
सगळ मनात उजळवलेले तसेच राहिले आणि आपण नेमके कस बोलायच या ताणाने मी चक्क हमसुन रडायला लागली. पण मग अजुनही आपल्यासाठी बर्यापैकी अनोळखी असलेल्या माणसासमोर रडायची लाज वाटुन मी सुरुवात केली. मराठी माणूस नेहमी अशा अवस्थेत इंग्रजीचा आधार घेतो
"I don't think we are made for each other. I can not stay with someone who is ... who doesn't fit in my expectations"
पतिदेव स्तंभित. पण माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी त्यांनी डोळ्यांनीच मला "तू बोल"ची खूण केली.
"गेल्या काही दिवसात झालेल्या बोलण्या वरुन मला वाटते आपली एकही आवडनिवड जुळत नाही. आयुष्य सोबत काढायच असेल तर आपल्यात काहीतरी एकमत असाव लागेल ना?"
"अग पण लग्नाला फक्त चाळीस दिवस झालेयेत आपल्या."
"पण तरीही मला नाही वाटत आपले हे नाते खुप दिवस टिकेल."
"थोडा वेळ दे, आपले नाते अजुन immature आहे initial stage ला आहे. हळुहळू आपण बदलुया एकमेकांसाठी."
""किती बदलणार....?संपूर्ण बदलाव लागेल आपल्या दोघांना, मला नाही वाटत ते शक्य आहे."

नवरा फक्त हसला. म्हणाला " महिने दे , मग तू म्हणशील तसेच करुया"

-----------------------------------------------------------------------------------
लग्नाला आता नऊ वर्षे होत आलीत. या नऊ वर्षात काय काय बदललय आम्हा दोघात? सगळच... अगदी सगळ बदललय. तो मी झालाय अन मी त्याच्या रंगाने न्हाऊन निघालीय.
नऊ वर्षापूर्वी पिझ्झा "आय हेट " म्हणणारी मी आता नवर्याने पिझ्झा खायला जाऊया म्हणायचा अवकाश की झटपट तयार होते.
चायनीज "नको बाबा" म्हणणारी मी आता चायनीज रेस्टॉरेंट दिसले की "ओह येस्स" म्हणते.
कविता बिविता "नाही नाही , मुळीच नाही" म्हणणारा तो आता आवर्जुन छानशी कविता वाचायला मिळाली की मला फॉरवर्ड करत असतो.
गझल " ओह नो" म्हणणारा तो आमच्या पहिल्या बाळाची चाहुल लागल्याचे कळताच आनंदाने मला जगजीत सिंगच्या "लाईव प्रोग्राम्"ला घेऊन गेला.

रब ने बना दी जोडीच्या निमित्ताने कितीतरी दिवसांनी ते जुने दिवस आठवुन खुप हसलो. देव जोड्या बनवतांना उगीच रेघा ओढत नाही तर विचार करुन बनवतो, यावर माझा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला.