मला एक कळतच नाही आजकाल मुलींनी हा नवाच सुर काय लावलाय। अगदी सगळ्या भारतीय मुली हल्ली म्हणतात "मला ना अस्सा नवरा हवा की जो घरातही अगदी बरोबरीने काम करणार" त्यावरुन एक दोन घटस्फोट माझ्याच ओळखीत झाल्यावर मग मात्र मला धक्काच बसला.
मुलींना स्वयंपाक करता यावा ही लग्न करतांना जवळ जवळ सगळ्याच मुलांची अपेक्षा असते... यात म्हणे आजकाल मुलींना अपमान वाटतो। कुणी सांगेल का यात अपमानास्पद असे काय आहे?
जगाच्या पाठीवर जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी आपण भारतीय मुली स्वत:चे गोडवे गात असतो आम्ही अशा पतिव्रता... पतिची अशी सेवा करतो... यंव नी त्यंव.... कधी कधी वाटते, नवऱ्यांना जर तोंड उघडायची संधी दिली तर सगळ्या जगाला कळेल की भारतीय पुरुष किती बिच्चारा आहे। बायकोने स्वयंपाक करायचा आणि तो खाऊ घालतांना मात्र "मीच कशी एकटी काम करते" याचा पाढा वाचुन दाखवायचा.... च्च च्च च्च .... बिचारा नवरा कसा ते जेवण गिळतो त्याचे त्यालाच माहिती.
नांव बदलणार नाही, मंगळसुत्र घालणार नाही, टिकली बांगडीचा अट्टाहास नको हे काही अंशी समजुन घेता येते। राहणीमान बदलले त्यात या गोष्टी सांभाळणे कदाचित कठिण झाले असेल पण मध्यंतरी या सगळ्या अटी व्यतिरिक्त एक नवीनच गोष्ट ऐकली. लग्न झाल्यावर तिने त्याला सांगितले "मला मूल नको... मलाच का मूल व्हायला हवे, तुला का नको?" हा तिचा सवाल. "अग तुला होणारे मूल तुझे अन माझंच तर असेल ना... वगैरे वगैरे" त्याचा जवाब. नंतर थोडे दिवस समजुत घालणे आणि अजुन दोन चार वर्षे "तिलाच कधीतरी मूल होउ द्यावेसे वाटेल" म्हणुन वाट बघितली पण नाहीच. "मूल स्त्रीला होणे" हे तिला "स्त्रीनेच स्वयंपाक करण्याइतकेच" हीन वाटायेच... परिणीती घटस्फोटात.
नौकरी करुन रोजच्या रोज स्वयंपाकही केला आणि मुलांनाही सांभाळले... एवढेच काय आम्हाला संस्कार दिलेत आणि उच्च शिक्षणही... ती व्यक्ति म्हणजे माझी आई। आई स्वयंपाक करते म्हणुन हीन आणि पप्पा करत नाहीत म्हणुन उच्च असे कधीच वाटले नाही. उलट नौकरी करुनही संसाराचा खुपसा भार आईनेच उचलला आणि पपांना त्यांच्या करीअरमध्ये कधी घरच्या कटकटींचा सामना करावा लागला नाही, या गोष्टीचे कौतुक आणि कृतज्ञता नेहमी त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसली.
ज्या मुली आजकाल "नवऱ्याला स्वयंपाक यायलाच हवा"चा अट्टाहास धरतात त्यापैकी किती जणीनी वडिलांनी बनवलेले जेवण खाल्लेय? किती मुलींच्या आईने अगदी असाच अट्टाहास केलाय?
शेफ असलेला संजीव कपूर स्वत:च्या घरी मात्र अल्योनाने म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले जेवणच पसंद करतो। सौ माधुरी नेने म्हणे डॉ. श्रीरामचा डबा स्वत: बनवुन देते ई.ई. रसभरीत गोष्टी अगदी चवीने वाचायच्या आणि नंतर ये रे माझ्या मागल्या.
मुलींना पैसे कमावता येईल, संसाराला हातभार लावता येईल याचे शिक्षण जरूर द्यावे पण जोडीने संसार टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तडजोडीचे शिक्षण देणे खुप खुप आवश्यक आहे।
मुलगी किंवा स्त्री ही निसर्गाने बनवली आहे तशीच राहणार. काही जबाबदाऱ्या निसर्गाने स्त्री पुरुष दोघांवर टाकल्यात. त्यांचा अव्हेर करुन चालणार नाही. शिवाय त्या दोघांची शरीर रचना किती अन कशी वेगळी असते हे ही समजुन घेणे आवश्यक आहे. एकाच कंपनीत सारख्याच पदावर काम करणाऱ्या स्त्री अन पुरुष कामगारांची पाहणी केली असतांना आढळुन आले की स्त्री अधिक क्षमतेने स्ट्रेस हाताळु शकते याउलट पुरुषाला मात्र सारख्याच पातळीच्या स्ट्रेसने बीपी, हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.
जेव्हा नवरा बायको दोघेही ऒफिस मधुन घरी येतात त्यावेळी पुरुष आल्या आल्या सोफ्यावर बसुन पाण्याची अपेक्षा करतो आणि स्त्री पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागते यात महत्वाचा हात असतो निसर्गाचा.... थकवा झटकुन आपल्या लोकांसाठी पटकन कामाला लागावे यात तिचे हार्मोन्स तिला मदत करत असतात।
पुरुषाने निर्बंध जीवन जगावे अन स्त्री ने मात्र केवळ कष्टच करावे अशा मताची मुळीच नाही। पण मुलींनी निसर्गदत्त जबाबदाऱ्या अव्हेरुन उगीच संसाराची माती करावी, हे मात्र पटत नाही. त्याला स्वयंपाक येत नसेल पण राजकारणातल, खेळातलं त्याला आपल्यापेक्षा जास्त समजते, याचे कौतुक हवच... त्याच्या इतर मित्रांपेक्षा त्याने किती लवकर प्रगती केली याचे मोल नाही का?
हे सगळं काही लिहुन झाल्यावर मुळ्ळीच स्वयंपाक न येणाऱ्या पण माझ्यावर जीव ओवाळुन टाकणाऱ्या माझ्या लाडक्या नवऱ्याला हा लेख भेट....