August 21, 2008

दंतकथा

दंतकथा
मुलाचा चौथा वाढदिवस झाला आणि त्या रात्री त्याचे दात ब्रश करतांना पाहिले की मागच्या एका दाताला तपकिरी / चॉकलेटी रंगाचा डाग पडलाय. आधी वाटले केकचा डाग असावा. पण दात घासल्यानंतरही तो डाग तसाच... मग मात्र धस्स झाले. चार वर्षाच्या मुलाचा दात किडलाय की काय या भितीने रात्रभर झोपच आली नाही। दुसऱ्याच दिवशी धावत पळत डेंटिस्ट गाठला. चेक केल्यानंतर कळले की दात पूर्ण किडलेला नाही. नुकतीच सुरुवात झालीय.तो डाग डॉक्टरांनी त्यांच्या हत्यारांनी पळवुन लावला. आणि दातात कॅविटी/ खड्डा नसल्याचे सांगितले तेव्हा जीव भांड्यात पडला. दोन तीनदा ब्रशिंग आणि चॉकलेट्स, केक , पेस्ट्रीज पूर्ण बंद किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ले तर चालेल असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरकडे त्या उंच खुर्चीवर बसलेला तो छोटासा जीव बघुन मला एकदम माझेच लहानपण आठवले. डेंटिस्ट कडे मी दहा वर्षाची असतांना गेली असेन माझा एक दात मागच्या बाजुला उगवतोय असे माझ्या आई वडिलांना वाटल्यामुळे ते मला घेऊन गेले होते. त्या खुर्चीवर बसण्याची भिती आजुबाजुला पसरलेल्या उपकरणामुळेच आली असावी. मी तिथे बसण्या आधीच मोठ्याने भोकांड पसरले होते. शेवटी पपांनाच मला मांडीवर घेउन बसावे लागले.
पण माझ्या बाळाने चक्क न घाबरता डॉक्टरला चेक करु दिलेच शिवाय डॉक्टरांनी त्याला समजावुन सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच दिवसा पासुन अमलात आणली. चॉकलेट्स बंद. ब्रशिंग दिवसातुन दोनदा अगदी नियमित.
त्याच्या दातांनी माझेच डोळे उघडले. आता आम्ही सगळेच गोड कमी खातोय शिवाय त्याच्या बरोबरच ब्रशही नियमितपणे दोनदा करतो.
माझ्या मैत्रिणींच्या घरीही थोड्याफार फरकाने हीच कहाणी. प्रत्येकीने एकदातरी डेंटिस्टची पायरी मुलांच्या तिसऱ्या चौथ्या वर्षीच चढलेली. माझ्या काही मैत्रिणींच्या मुलांचे दातही पाचव्या वर्षा आधीच काढावे लागलेत.
हे असे होण्याचे प्रमाण अचानकच का वाढले असावे याचा मी थोडा अभ्यास आणि डॉक्टरांशी चर्चा करुन आढावा घेतला
चॉकलेट्स नक्कीच दोषी आहेत पण खरे दोषी आहेत पालक।

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपणच त्यांना लावतो तर गोडाचे प्रमाण सुरुवातीपासुनच कमी ठेवावे।
कुठल्याही चांगल्या कामाचे बक्षिस म्हणुन चॉकलेट्स किंवा केक्स देउ नये।
दुध पिउन झाल्यावर मुलांना आठवणीने चुळ भरायला लावणे अत्यावश्यक आहे।
रात्री झोपतांना दुध देत असाल तर त्यानंतर ब्रश करायला सांगणे विसरु नका।
कोल्ड ड्रिंक्स फक्त छोट्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा हानीकारक आहेत।
घरात / बाहेर कोल्ड ड्रिंक्स च्या सेवनावर नियंत्रण करा।
मुले सोबत असतांना त्यांच्या समोर आपण जे पेय पितो तेच त्यांनाही प्यावेसे वाटणे साहजिक आहे। स्मोकर्स.... तुमचे स्वत:चे दंत आरोग्य खालावणार हे नक्कीच. पण तुमच्या सवयी पुढे तुमच्या मुलाने/ मुलीने उचलल्या तर साहजिकच येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे शरीराचे नुकसान होणार.
आई होण्याच्या आधी पासुनच स्त्रियांनी दातांची काळजी घ्यावी।
गरोदरपणात दातांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। बाळाचे दाताचे आरोग्य तो पोटात असतांनाच बहुतांशी ठरते.

तुम्हा सर्वांचे दात शाबुत राहोत आणि येणाऱ्या पिढीला चांगले भक्कम दात देण्याची शक्ति आपल्या पिढीला मिळो हीच प्रार्थना :)