June 17, 2008

फादर्स डे...

God took the strength of a mountain,

The majesty of a tree,

The warmth of a summer sun,

The calm of a quiet sea,

The generous soul of nature,

The comforting arm of night,

The wisdom of the ages,

The power of the eagle's flight,

The joy of a morning in spring,

The faith of a mustard seed,

The patience of eternity,

The depth of a family need,

Then God combined these qualities,

When there was nothing more to add,

He knew His masterpiece was complete,

And so, He called it ... Dad (author unknown)
१३ जुन १९९२ फादर्स डेच्या अलिकडे पलिकडे एक दोन दिवस. पण तो दिवस अगदी काळा ठरला आमच्यासाठी. पितृछत्र उजाडण्याच्या मार्गावर होते त्या वेळी माझं. पण आपल्या सगळ्यांचा तो आकाशातला पिता... त्याला या लेकीची दया आली. दहा हातांनी नियती आमच्या सुखाचा गळा आवळायला आली होती खरी पण मग तिची पकड सैल पडली.
माझ्यावर लहानपणापासुन एकाच व्यक्तिचा मोठ्ठा प्रभाव होता. ती व्यक्ति म्हणजे माझे पप्पु. पपांना नेहमीच पप्पु म्हणायची मी आणि मग ममा चिडायची. मी मोठी झाल्यावर तर तिला या गोष्टीचा फार राग यायचा पण पपा मात्र त्यावरुन कधीच चिडले नाहेत. दादी किंवा राजकुमारी याच नावाने बोलवायचेत मला. दादी- कारण माझीच दादागिरी चालायची घरावर. राजकुमारी... हे केवळ एक संबोधन नव्हते त्यांच्यासाठी. अक्षरश: राजकुमारी सारखेच वाढवले त्यांनी मला. छोट्या गावात राहुनही अगदी वाट्टेल त्या खेळण्यांचा हट्ट पुरवला गेला. अगदी दहा वर्षांची होईपर्यंत माझ्या वाढदिवसासाठी मला नेहमीच पपा पुण्याहुन कपडे आणत. फक्त कपडेच नसायचेत... खुप सारी खेळणी, खुप खुप पुस्तकं. वाचनाची आवड त्यांनीच दिलीय मला. पुढेपुढे पपांना जेव्हा जाणवले की कपड्या खेळण्यांपेक्षा मी पुस्तकांच्या भेटीने खुष होते तेव्हा त्यांनी दर दोन महिन्या आड पुणे फेरी सुरु केली. प्रत्येकवेळी एक नवा पुस्तकांचा खजिना त्यांच्या बॅगमधुन बाहेर पडायचा आणि मी समृद्ध होऊन जायचे. मिशा नावाचा एक छोट्यांसाठीचे मासिक त्यांनी खास रशियाहुन आमच्यासाठी वर्षभर मागवले. सोनेरी दिवस होते ते माझ्यासाठी.
रात्रंदिवस आमच्याकडे शेतकरी, ट्रक ड्रायव्हर लोकांचे येणेजाणे असायचे. कुणी गरीबीने खंतावुन, कोणी दारुत तर्र होऊन यायचे पण आमच्या घरातून बाहेर पडतांना मात्र सगळे अगदी आनंदी होऊन जायचे. पपांचा स्वभावच तसा होता - अगदी लाघवी.
माझं दहावीचं वर्ष सुरु झाले आणि जणु काही पपाच दहावीला असल्यासारखे रात्र रात्र माझ्याबरोबर जागायला लागलेत. माझ्या दहावी झालं की मला कुठेतरी बाहेर शिकायला पाठवायची त्यांची इच्छा होती. "माझी दादी पुण्यात शिकेल आणि माझ्यापेक्षाही मोठे यश मिळवेल." (माझे पपा पुणे युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत) "मोठ्ठी डॊक्टर बनणार आहे माझी दादी." त्यांच्या या स्वप्नांचे कधी ओझं नाही झालं मला कारण पपा जे सांगताय बोलताय ते होणारच असा विश्वास होता. वाटायच मी नक्कीच हे सगळं काही करुन दाखवेल पण असे काही होण देवाजीच्या मनात नव्हते कदाचित.
१३ जुनला पपांचा ऍक्सिडेंट झाला. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने ते कोमात गेले. अपघात झाल्यावर ६ तास ते उन्हात पडुन होते. नंतर धुळ्याच्या सरकारी इस्पितळात आणि तिथुन नागजी हॊस्पिटल नासिकला. पण पपांच्या अपघाताची खबरच आम्हाला एक दिवस उशिरा मिळाली. पपांची अवस्था पाहिल्यावर देव निर्दय आहे हाच एक विचार वारंवार मनात यायचा. प्रार्थना करतांनाही मी देवाला म्हणायचे "देवा, पपांनी खुप दिलय रे मला पण त्यांना अजुन मी काहीच दिल नाहीये. त्यांचे एक स्वप्न त्यांच्या लेकीकडुन पूर्ण होतांना त्यांना पाहु दे, बस्स" . देवाने ऐकले आणि पप्पु परत मिळालेत. माझ्यासाठी वर्षातला एकच नाही प्रत्येक दिवस फादर्स डे आहे. I Love you, Papa"

June 10, 2008

मोकळीक जुन्या आणि नव्या पिढीतली

श्रुती आणि मी हनिमूनच्या काळातल्या मैत्रिणी. केसरी बरोबर हनिमूनला आलेल्या चाळीस कपल्स पैकी श्रुती आणि देव एक. देवच्या मानाने रुपात थोडी डावी असली तरी तिच्या चेहऱ्यात एक निराळाच गोडवा होता.
केसरीच्या एका खेळात आम्हाला कळले की आमचे लग्न एकाच दिवशी एकाच मुहुर्तावर झालय. त्या खेळानंतर बऱ्याचदा गप्पात आम्हाला जाणवायचे की आमच्या आवडी निवडी पण सारख्याच आहेत. मग काय, हळुहळू आमची छान गट्टी जमली. एकत्र फिरणे, जेवणे गप्पा करणे. दिवस कसे संपलेत ते कळलच नाही. अकरा दिवसांचा हनिमून संपवुन मुंबईला परत आल्यानंतर अधुन मधुन आमचे फोनवर बोलणेही होत असे. जळगावसारख्या अतिशय थंड (सुस्त म्हणायचेय मला) गावातून आलेली असल्यामुळे मुंबईची जीवन शैली मला खुपच त्रासदायक वाटायची. बऱ्याचदा श्रुतीला मी ते बोलूनही दाखवायची आणि मग ती मला समजावायची "अग होईल सवय हळुहळू. नौकरी कर मग तुला खुप मज्जा वाटेल."
श्रुती एका डायमंड कंपनीत रिसेप्शनिस्ट होती. तिचा नवरा देव एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर. त्यादिवशी मला मरीन लाईन्सला एका इंटरव्ह्यु साठी जायचे होते. श्रुतीला फोन करून मी भेटीबद्दल विचारले. तीही मला भेटायला खुप उत्सुक होती. मला म्हणाली तू ये मग मी बॉसला विचारुन दोन तास ऑफ घेते. खुप गप्पा करुया.
गप्पा करताना नवीन लग्न झालेल्या दोन मुली एकमेकीना जे प्रश्न विचारणार तिकडे आमच्या गप्पांची गाडी वळली आणि श्रुतीचा चेहरा एकदम बदलला. डोळे भरुन आलेत. अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात चेहराही एकदम केविलवाणा दिसत होता. मला तर तिला विचारावे की नको असा प्रश्न पडला एकतर आमची मैत्री अगदीच नवी नवी. शिवाय इतका खाजगी विषय... उगाच खोलात शिरायला नको म्हणुन मग मीही गप्प बसुन तिच्याकडे एक गुपचुप एक नजर टाकली. थोडावेळ सांगु की नको अशा संभ्रमात मग तिने स्वत:च बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी तिने जे सांगितले ते आठवले की आजही अंगावर काटा येतो.
देव एकुलता एक मुलगा. ठाण्यात आईवडिलांचा एक बेडरुमचा फ्लॅट. देवचे लग्न होईपर्यंत बेडरूम मध्ये त्याचे आई वडिल झोपत आणि देव हॉलमध्ये. लग्न झाल्यावर (एका बेडरूमच्या घरात) अलिखित नियमाने बेडरूम खरे तर देवलाच मिळायला हवी आणि त्यानेही ते ग्रुहीत धरले होते. पण लग्न झाल्या दिवसापासून एकदाही ते बेडरूम मध्ये झोपु शकले नव्हते. हनिमून वरुन परत आल्यावर रात्री देवने बेडरूम मध्ये जाण्यासाठी पाऊल टाकले तर त्याच्या आईने त्याला सांगितले की "तुम्ही दोघे हॉलमध्येच झोपा. आता या वयात आम्हाला जागा बदल झाली तर झोप येणार नाही." श्रुतीला तर यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते.
पण तरीही श्रुती आणि देव दरवाजा नसलेल्या हॉलमध्ये जाऊन झोपले. देव झोपला दिवाण वर आणि श्रुती जमिनीवर गादी टाकुन. त्या रात्री दोघानाही झोप आलीच नाही. श्रुती रात्रभर रडत होती आणि देव छताकडे पाहुन नक्की काय घडले याचा विचार करत होता. असे दोन तीन दिवस गेल्यावर मग मात्र श्रुतीला देवचा राग आला. जे काही झाले त्यानंतर आई वडिलाना समजावणे त्याचेच काम होते. श्रुतीने ठरवुन टाकले की आता देवला स्पर्श करु द्यायचा नाही. हॉलला दरवाजा नसल्यामुळे देवलाही श्रुतीशी जवळीक करता येत नव्हती. लग्नाला २ महिनेही झालेले नसताना अशा भयानक मानसिक स्थितीला त्या दोघाना सामोरे जावे लागत होते.
हा असा प्रकार ऐकल्यावर मी एकदम हतबुद्धच झाले. सल्ला तरी काय देणार. पण मग तरीही माझ्या परीने मी तिला थोडे समजावुन घरी परतली. नवऱ्याला सांगु नको असे वचन श्रुतीने माझ्याकडुन घेतल्यामुळे देवशी या विषयावर बोलण्याचा मार्गच खुंटला.
असेच सहा महिने गेलेत. आम्ही आपापल्या आयुष्यात मग्न झालोत. फोन वर बोलणे तर व्हायचे पण पुन्हा तो विषय आमच्या बोलण्या कधीही आला नाही. एक दिवस मात्र श्रुतीचा मला "भेटायला लगेच ये" असा फोन आला. तिच्याकडे असलेली "गुड न्युज" तिला माझ्याशी शेअर करायची होती. माझा आश्चर्यचकित चेहरा पाहुन तीच म्हणाली "अग आम्ही दोघानी नवीन मार्ग शोधला. आता आम्ही अर्धी रात्र किचन मध्ये झोपतो."
लोकल मधुन घरी परत येताना मला सारखे वाटत होते "एकुलता एक मुलगा... त्याच्या सांसारिक सुखात अडथळा करणारे त्याचेच आई वडिल आणि तरीही हसत मुखाने सहन करणारी बिचारी सून. तक्रार करायचीच नाही का तिने... किंवा मग तिच्या नवऱ्याने. शारिरीक सुख हा इतका खाजगी विषय असतो का की आपण आपल्या आई वडिलाना पण सांगु नये. कुठेतरी किचनमधल्या टीचभर जागेत घाईघाईने उरकलेल्या शारिरीक जवळिकीला शरीर सुख तरी कसे म्हणावे? आणि वरकडी म्हणजे मनाविरुद्ध सहन करुन तरीही आम्हाला हे पटत नाही, हे ही दाखवु नये. आई वडिलाना आपल्या लेकरांच्या सुखासाठी थोडीही तडजोड करणे, एवढे का खुपावे?" खुप प्रश्न पण सगळे अनुत्तरीत. विचार करुन मला वाटायचे डोके फुटुन जाईल. पण मग हळुहळू मी ही ते सगळे विसरली.
श्रुतीच्या बाळाला हॉस्पिटल मध्ये बघायला गेली तर जवळपास कुणी नाही असे बघुन ती हळुच म्हणाले "जरा नाकाजवळ घेउन बघ बरे, माझ्या बाळाला फोडणीचा तर वास येत नाहीयेना." आणि आम्ही दोघी दिलखुलास हसलो.

June 09, 2008

आकाश

हे तारकांनी भरलेले माझे आकाश... किती सुंदर दिसतय ना दुरुन पण सगळेच तारे या आकाशाला सजवणारे नाहीत, दुर्दैव माझं. काही तारे दुरुन तारे वाटतात खरे पण असतात मात्र दगड; चमचमणारे दगड. पण हो, अगदी सुंदर तारेही आहेत या आकाशात. माझे ममीपपा माझा गोडुला सतु, माझा निव्वळ परमानंद- माझा राधु. पण या सगळ्यापेक्षाही सुंदर आहे : माझ्या या आकाशाला सजवणारा, खऱ्या अर्थाने शोभा आणणारा एकच तारा... माझा एकमेव प्रिय सखा, माझा जीवनसाथी - माझा मनु. मनुशिवाय या तारांगणाला शोभा नाही. मनुशिवाय या आयुष्याची कल्पना पण करणे शक्य नाही. एक खरा मित्र, एक जबाबदार नवरा आणि एक प्रेमळ पिता या सगळ्या भुमिका इतक्या सुंदर पद्धतीने हाताळतांना त्याच्याशिवाय कोणालाच मी पाहिले नाही.पति पत्नीच्या नात्यात मैत्री हवी , असे म्हणतात ना. मी ही ऐकले होते लग्नाआधी. पण आमच्या दोघांत मात्र आधी पति पत्नीचे नाते आले आणि मग मैत्री. या सात वर्षात मात्र तो माझा सगळ्यात जवळचा मित्र झालाय. सगळं काही समजुन घेणारा, जमत असेल तरच त्यावर तोडगा काढणारा नाहीतर काही समस्या सरळ देवावर सोपवुन मोकळा होणारा असा हा माझा गोड मित्र। हे पान खास त्याच्यासाठी.
माझ्या आकाशीच्या या ध्रुव ताऱ्याला माझ्या आयुष्यातही अढळपद मिळो, हीच देवाला प्रार्थना.